गोपूजक असूनही ऋषी सुनक यांचं बीफ इंडस्ट्रीला प्रोत्साहन, हे आहे कारण

लंडन, 27 ऑगस्ट : गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. बोरिस जॉन्सन हे पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर लिझ ट्रस या पंतप्रधान झाल्या. परंतु, काही कारणांमुळे ट्रस यांना अल्पावधीतच हे पद सोडावं लागलं. त्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे या पदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. अपेक्षेप्रमाणे ते पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. नुकताच त्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सुनक यांच्या कामगिरीकडे जगासह ब्रिटन आणि भारताचं विशेष लक्ष लागलं आहे. एक ब्रिटिश नेता म्हणून त्यांची अनेक गोष्टींशी बांधिलकी आहे. पण यापैकी काही गोष्टींमुळे भारतातील हिंदूंचं मन कदाचित दुखावलं जाऊ शकतं. सुनक हे स्थानिक गोमांस वाचवण्याचे आणि वाढवण्याचे समर्थक आहेत. नेमकी हीच बाब हिंदूचं मन दुखवणारी ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात गोमांस व्यवसायाबाबत ते कोणती भूमिका घेतात याकडे विशेष लक्ष असेल.
ब्रिटनमधील सर्वोच्च राजकीय पद भूषविणारे ऋषी सुनक हे पहिले गैर श्वेत नेता आहेत. विदेशात जन्म आणि शिक्षण घेतलेल्या सुनक यांना हिंदू असल्याचा अभिमान वाटतो. ते त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि त्याच्याशी संबंधित परंपरांचं सार्वजनिक प्रदर्शनदेखील करतात. अनेक फोटोंमधून सुनक मंदिरात पूजा करताना, कलव बांधताना आणि गायीची सेवा करताना दिसून आले आहेत. हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानतात. पण सुनक हे ब्रिटनमधील स्थानिक गोमांस व्यवसाय वाचवण्याचे आणि त्याच्या वृद्धीचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांची या संदर्भातली भूमिका कदाचित हिंदूंचं मन दुखवू शकते, असं बोललं जात आहे.
ब्रिटनच्या गोमांस उद्योगाला चालना देण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर सुनक म्हणाले होते, की लोकांना त्यांनी काय खायचं ते निवडण्याचा पर्याय उपलब्ध असावा. मी अशा सरकारचे नेतृत्व करेन जे आपल्या शेतकऱ्यांना देश-विदेशात चॅम्पियन बनवेल.
जुलै 2022 मध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रचार करताना ऋषी सुनक यांनी `द टेलिग्राफ`ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवरून असं दिसून येतं की हिंदू असणारे सुनक स्वतः गोमांस सेवन करत नाहीत. पण आपल्या देशात स्थानिक अन्न खरेदीसाठी ते कॅम्पेन चालवतील. अन्न सुरक्षा विषयक समिटचं आयोजन करतील आणि त्यासोबत गोमांस सेवनाचे फायदेदेखील सांगतील.
सुनक यांनी सांगितलं, “ग्रामीण मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं किती महत्त्वाचं आहे, याची मला कल्पना आहे. माझ्या मतदारसंघातील शेतकरी गोमांस आणि लॅम्ब मीटसाठी प्राणी पाळतात. त्यांना मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी माझ्या शेतकऱ्यांना सदैव पाठिंबा देईन.“
2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सुनक यांनी ब्रिटिश संसदेत श्रीमद्भगवत गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान दिवाळीवेळी ते दिवे लावताना दिसले होते. या सर्व गोष्टी पाहता भारतातील एक वर्ग सुनक विजयी झाल्याने आनंदी झाला आहे. पण सुनक यांची बीफ इंडस्ट्रीबाबतची भूमिका भारतातील हिंदूंचं मन दुखवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.