ख्रिसमसआधी मॉल ऑफ अमेरिकामध्ये गोळीबार, 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

वॉशिंग्टन, 24 डिसेंबर : अमेरिकेतील मिनियापोलिस इथल्या मॉल ऑफ अमेरिकामध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर मॉल बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ब्लूमिंगटन पोलिस प्रमुख बूकर होज यांनी सांगितलं की, गोळीबारात ठार झालेल्या तरुणाचे वय 19 वर्षे होते. गोळीबारावेळी एक गोळी रस्त्यावरून जाणाऱ्याच्या जॅकेटला घासून गेली होती. मॉलमध्ये दोन गटात वाद झाला आणि त्यानतंर एकाने बंदूक काढून गोळीबार केला असेही पोलिसांनी सांगितले.
मॉलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्लूमिंगट्न पोलिस विभागाने रात्री आठ वाजता गोळीबाराच्या घटनेनंतर तात्काळ कारवाई केली. दुकानदारांना बाहेर पाठवण्यात आले. त्यानतंर जवळपास तासभर मॉल बंद होता. सोशल मीडियावर याचे काही व्हिडीओसुद्धा व्हायरल झाले आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने मॉलमध्ये गर्दी असताना घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
हेही वाचा : रुग्णालयात जागा नाही, स्मशानभूमीत लांबच लांब रांगा; चीनमधील कोरोना उद्रेकाचं भारतावरही सावट?
पोलिस प्रमुख बूकर होज यांनी सांगितलं की, मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. गोळीबाराची घटना पहिल्या मजल्यावर झाली. मॉल सिक्युरीटीचा व्हिडीओ जारी झाला असून त्यात दिसत आहे की, दोन गटात जोरदार वाद झाला. यातील एका गटात ५ जण तर दुसऱ्या गटात ९ जण होते. या वादावेळी एकाने बंदूक काढून गोळीबार सुरू केला.
पीडित तरुणाला अनेक गोळ्या लागल्या आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. ख्रिसमसआधी अमेरिकेत मॉलमध्ये मोठ्या संख्येने लोक गर्दी करतात. १९९२ मध्ये मॉल ऑफ अमेरिका सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून हा मॉल पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. या मॉलमध्ये बंदूक नेण्यास बंदी आहे पण याच्या गेटवर मेटल डिटेक्टर नाही. त्यामुळे आता सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.