Home » क्रीडा » सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकर सोडणार मुंबई, पाहा कोणत्या संघाकडून खेळणार?

सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकर सोडणार मुंबई, पाहा कोणत्या संघाकडून खेळणार?

सचिनचा-लेक-अर्जुन-तेंडुलकर-सोडणार-मुंबई,-पाहा-कोणत्या-संघाकडून-खेळणार?

मुंबई, 11 ऑगस्ट: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरनं मुंबई क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी डोमेस्टिक सीझनमध्ये तो गोव्याकडून खेळण्याची शक्यता आहेत. काही दिवसांपूर्वी अर्जुननं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे इतर राज्याकडून खेळण्याची परवानगी मागितली होती. त्यावर एमसीएनं त्याला नाहरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी दिली आहे. त्यामुळे आगामी मोसमात अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून खेळताना दिसणार नाही. 22 वर्षांचा अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्यानं मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली टी20त दोन सामने खेळले आहेत. तर गेल्या रणजी मोसमातल्या काही सामन्यांसाठी त्याचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला होता. आयपीएलमध्ये गेले दोन मोसम अर्जुन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातही सामील होता. पण एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. SRT स्पोर्टस मॅनेजमेंटचं स्पष्टीकरण अर्जुनच्या मुंबई सोडण्याच्या निर्णयावर सचिन तेंडुलकर स्पोर्ट्स मॅनेजमेंटकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ”करियरच्या या वळणावर अर्जुनसाठी मैदानात जास्तीत जास्त खेळणं महत्त्वाचं आहे. आम्हाला विश्वास आहे की या निर्णयामुळे अर्जुनला स्पर्धात्मक सामन्यांमध्ये खेळण्याची जास्तीत जास्त संधी मिळेल. अर्जुन त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतल्या एका नव्या इनिंगची सुरुवात करत आहे.” अर्जुनची कारकीर्द अर्जुननं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वयोगटातील स्पर्धांमधून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानं मुंबई अंडर-16, मुंबई अंडर-19 संघांचंही प्रतिनिधित्व केलं आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-19 कसोटी सामन्यांसाठी त्याची भारतीय युवा संघात निवड झाली होती. त्यानंतर तो मुंबईच्या टी20 संघातही दाखल झाला होता. पण सय्यद मुश्ताक अली करंडकात त्याला दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर रणजी करंडकाच्या साखळी सामन्यात मुंबई संघात निवड होऊनही त्याला अंतिम अकरात एकदाही संधी मिळाली नाही. पुढे रणजीच्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी त्याला संघातून वगळण्यात आलं. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलच्या गेल्या दोन मोसमात एकाही सामन्यात खेळण्याची संधी त्याला मिळालेली नाही. इंग्लंडमध्ये भरपूर सराव मुंबई इंडियन्सनं काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये युवा खेळाडूंसाठी टी20 सामन्यांचं आयोजन केलं होतं. मुंबई इंडियन्सच्या त्या डेव्हलपमेंट स्क्वाडमध्ये अर्जुनचा समावेश होता. या संघात दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविससह, अनमोलप्रीत सिंग, कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग हे युवा भारतीय खेळाडूही सहभागी झाले होते. गोव्याकडून खेळण्याची शक्यता दरम्यान मुंबई सोडल्यानंतर अर्जुन गोव्याकडून खेळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्याच्या खेळण्यासंदर्भात गोवा क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकरांनी पीटीआयशी बोलताना म्हटलंय, “आम्ही एक डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत आहोत. त्यासाठी आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोव्याच्या संघात खेळण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आम्ही प्री सीझन सराव सामनेही आयोजित केले आहेत. त्या सामन्यांमध्ये अर्जुन खेळणार आहे. या सामन्यातल्या कामगिरीच्या आधारेच निवड समितीकडून पुढचा निर्णय घेतला जाईल.”

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Arjun Tendulkar, Cricket, Sachin tendulkar

Leave a Reply

Your email address will not be published.