कोण आहेत 33 वर्षीय बिलावल भुट्टो झरदारी? PM मोदींवर टीका केल्याने आले चर्चेत

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण केला आहे. या टिप्पणीवर आक्षेप घेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी दिल्लीतील पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर ‘पाकिस्तान हाय-हाय’ आणि ‘बिलावल भुट्टो माफी आंबा’ अशा घोषणा देत निदर्शने केली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भाजप पक्ष शनिवारी या वादग्रस्त वक्तव्याविरोधात देशव्यापी आंदोलन करणार आहे. पण, असा वाद ओढवून घेणारे बिलावल भुट्टो आहे तरी कोण?
काय आहे संपूर्ण वाद?
वास्तविक अलीकडेच, संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत मोदींवर हल्ला करताना भुट्टो म्हणाले, “ओसामा बिन लादेन मेला, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे.” एस जयशंकर यांनी पाकिस्तानला ‘दहशतवादाचे केंद्र’ असे संबोधल्यानंतर भुट्टो यांनी ही टिप्पणी केली. भुट्टो यांच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, या टिप्पण्या पाकिस्तानसाठी नवा नीचांक आहेत. भुट्टो यांच्या या विधानामुळे देशभरात वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले आहे.
कोण आहेत बिलावल भुट्टो झरदारी?
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा मुलगा बिलावल भुट्टो झरदारी सध्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. एप्रिलमध्ये, वयाच्या 33 व्या वर्षी ते देशाचे “सर्वात तरुण” परराष्ट्र मंत्री बनले. 2007 मध्ये आईच्या हत्येनंतर बिलावलला पीपीपीचा वारसा मिळाला.
वाचा – रशियाकडून युक्रेवर पुन्हा मिसाईल हल्ले, प्रमुख शहरं निशाण्यावर
तेव्हा ते 19 वर्षांचे होते आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या क्राइस्ट चर्च कॉलेजमध्ये शिकत होते. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, पीपीपीचे नेतृत्व करण्यासाठी बेनझीरचे उत्तराधिकारी बिलावल यांना “भुट्टो वारसा वापरून पक्ष मजबूत करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल मानले जात होते”. त्यानंतर त्यांनी आपल्या आईचे आडनाव जोडले आणि बिलावल झरदारी हे बिलावल भुट्टो झरदारी झाले.
2018 मध्ये ते पहिल्यांदाच पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीवर निवडून आले. एप्रिलमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात मदत करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी भुट्टो हे एक असल्याचे एएनआयने वृत्त दिले आहे.
याआधीही वादग्रस्त विधानं
बिलावल भुट्टो झरदारी यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेकदा संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, याआधीही ते याबाबत बोलत आहेत. 2014 मध्ये, त्यांनी पाकिस्तानमधील पंजाबमधील मुलतान प्रदेशातील त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले की पीपीपी भारताकडून “संपूर्ण काश्मीर” परत घेईल. त्यांच्या या वक्तव्यावरुन बराच वाद झाला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे तत्कालीन प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी भारताच्या अखंडता आणि एकात्मतेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही असे म्हटले होते.
भुट्टो यांनी या वर्षाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मॉस्को दौऱ्याला पाठिंबा देऊन वादाला तोंड फोडले होते. खानचा बचाव करताना पीपीपी अध्यक्ष म्हणाले की, इम्रान खान यांना युक्रेनवर आक्रमण करण्याच्या रशियाच्या योजनेबद्दल कोणतीही माहिती नसेल. ते त्यांच्या कमकुवत उर्दूसाठीही ओळखले जातात. उर्दूत जीभ घसरल्याने त्यांच्यावर मीम्सही व्हायरल झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.