accident

कुरकुंभ (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ हद्दीतील सेवा रस्त्यावर गॅस सिलिंडरची वाहतूक करणार्‍या (पिकअप) वाहनाने एका दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक ठार झाला असून, मागे बसलेला एकजण जखमी झाला आहे. अपघातानंतर पिकअपचालक वाहन सोडून पळून गेला. हा प्रकार बुधवारी (दि. 28) रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास घडला. संतोष वामन खाडे (वय 19) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव योगेश वारके असे जखमीचे नाव आहे.

संतोष कंपनीतून घरी निघाला होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत वामन यशवंत खाडे (वय 52, रा. शेवाळे प्लांट, कुरकुंभ, ता. दौंड, मूळ रा. रासळ, पोपाली, ता. सुधागड, जि. रायगड) यांनी कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पिकअप चालकाविरुध्द दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खाडे हा कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील एमक्युअर फार्मास्युटीकल कंपनीत कामाला होता. त्याची सेकंड शीप असल्याने तो दुपारी अडीचच्या सुमारास घरून कामाला गेला होता. कामावरून सुटी झाल्यावर दुचाकीवरून (एमएच 22 एएक्स 9189) तो कामातील मित्र रूपेश संजय कसबे याला फौजी हॉटेलसमोर सोडून परत गौरव योगेश वारके याला घेऊन सेवा रस्त्याने कुरकुंभकडे निघाला होता.

यादरम्यान मळदकडे भरधाव वेगात जाणार्‍या पिकअपने (आरजे 43 जीए 3883) दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात संतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला गौरव वारके याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यास, नडगीस मार लागला आहे. या घटनेनंतर पिकअपचा अज्ञात चालक फरार झाला. तपास कुरकुंभचे पोलिस हवालदार शंकर वाघमारे
करीत आहेत.