Accident

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारास समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील मालवाहु ट्रकने चिरडल्याने अपघात झाल्याची हदय द्रावक घटना घडली. पाचोड (ता. पैठण) येथील थेरगाव  फाट्याजवळ सोमवारी (दि. ५) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घडली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा औरंगाबादला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू  झाला.

दत्तु उत्तमराव लांडगे (वय ३५, रानारेगाव-औरगाबाद) , भगवान हरिचंद्र राऊत (वय ३६, रा.हर्षी ता.पैठण) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. यासंबंधी अधिक माहिती अशी की, हर्षी खुर्द (ता.पैठण ) येथील भगवान हरिश्चंद्र राऊत (वय ३६) हे आपल्या मित्रासमवेत नारेगाव, औरगाबाद येथे बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतात. ते सोमवारी (ता. पाच) सकाळी आपला मित्र दत्तु उत्तम लांडगे (वय ३२) यांस घेऊन गावी दुचाकी( क्रमांक : एम.एच.२० सी डी.४९३) ने हर्षी (ता.पैठण) येथे कुटुंबियाला भेटायला गेले होते. कुटुंबियाला भेटून ते दुचाकीने पाचोडमार्गे औरंगाबादला जाणेसाठी निघाले असता थेरगाव फाट्यानजीक समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहु ट्रकने (क्र.आर. जे१९ जीई ५४२९) दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दत्तु लांडगे हे फरफटत जाऊन गाडीच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भगवान हरिश्चंद्र राऊत याच्या दोन्ही पायावरून चाक गेल्याने दोन्ही पायाचा चुराडा झाला. जवळपास शंभर फुटापर्यंत दत्तु लांडगे यांस ट्रकने फरफटत नेल्याने रस्त्यावर रक्त व हाडामांसाचा  सडा पडला होता.

अपघात घडताच कंटेनर चालकाने कंटेनरसह घटनास्थळाहून पळ काढला. त्याचवेळी थेरगाव येथील अनेक युवक जवळच असलेल्या शाळेच्या मैदानावर व्यायाम करत असल्याचे पाहुन त्याने ट्रक जागेवर सोडून पोबारा केला. तरुणांनी हा अपघात पाहून पाचोड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे हे त्यांचे सहकारी जमादार किशोर शिदे , आण्णासाहेब गव्हाणे, संदीप पाटेकर , विलास काकडे , सुधीर भाट , गावांतील बप्पासाहेब ताकपिर , अर्जुन हजारे , कृष्णा आगळे आदीनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम वाहतूक सुरळीत केली व खासगी वाहन थांबवून मदतीसाठी भगवान राऊत यांना पाचोड्च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याने  प्रथोमपचार  करुन प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तातडीने रुग्णवाहिकेतून औरंगाबादला हलविण्यात आले परंतु रक्तस्ञाव मोठ्या प्रमाणात झाल्याने वाटेतच चित्तेगावा जवळ त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान   सपोनि गणेश सुरवसे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी मृत दत्तु लांडगे  यास पाचोड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत आहेत.

कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर

थेरगाव  गावाजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या ट्रक दुचाकी अपघातात हर्षी येथील भगवान राऊत आणि  नारेगाव  येथील दत्तु लांडगे याचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला  दोन्ही मिञ हे   बांधकाम व्यवसायिक होते त्यांच्या  घरातील कमावता  व्यक्ती गेल्याने त्याच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला.पंचक्रोशीत या घटनेबद्दल सर्वञ  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.