एकनाथ शिंदे यांचा अब्दुल सत्तार यांना फोन, विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बातचित, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

एकनाथ-शिंदे-यांचा-अब्दुल-सत्तार-यांना-फोन,-विरोधकांच्या-राजीनाम्याच्या-मागणीवर-बातचित,-पडद्यामागे-नेमकं-काय-घडतंय?

एकनाथ शिंदे यांनी नागपुरात दाखल होताच अब्दुल सत्तार यांना फोन केल्याची माहिती समोर आलीय.

विवेक गावंडे, नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले. अब्दुल सत्तार यांनी वाशिम जिल्ह्यातील गोचरणाची 150 कोटींची सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप पवारांनी केला. यावेळी अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजित पवार यांच्या मागणीला जोर देत सभागृहात विरोधी पक्षाच्या सर्वच आमदारांनी या मागणीवर जोर धरला. विरोधक एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी विधान भवनाच्या पाऱ्यांवरही आंदोलन करत अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणावर अब्दुल सत्तार यांनी आज काहीच ठोस अशी भूमिका मांडली नाही. तर सत्तार यांच्या पक्षाचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सभागृहात उपस्थित नव्हते. ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्लीला गेले होते. पण आता ते नागपुरात दाखल झालेत. विशेष म्हणजे नागपुरात दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन केल्याची माहिती समोर आलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी आज विधानसभेत जो काही गदारोळ झाला, अब्दुल सत्तार यांच्यावर जे काही आरोप झाले त्याची माहिती घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी अब्दुल सत्तार यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांची सविस्तर बाजू ऐकून घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांच्या फोनवरील संभाषणानंतर सत्तार उद्या स्वत: विधानसभेत आपल्यावर झालेल्या आरोपांवर सविस्तर उत्तर देणार आहेत, अशी माहिती समोर आलीय. विधानसभेत बाजू मांडण्यासाठी सध्या उत्तराचं ड्राफ्टींग सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलीय.

अब्दूल सत्तार यांच्यावरील आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

अब्दूल सत्तार यांच्यावरील आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतच भूमिका मांडली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोपांवर विधानसभेत प्रतिक्रिया दिलीय. आपण जो मुद्दा मांडलात त्याची जरुर माहिती घेतली जाईल. ती माहिती घेऊन वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडू. सिल्लोड महोत्सवासंदर्भात जे मुद्दे मांडले आहेत त्याची गंभीर दखल शासन घेईल. त्यासंदर्भात कुठेही असं चाललं असेल तर या विरोधात सरकार कारवाई करेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘अब्दुल सत्तार यांचं प्रकरण गेल्या सरकारमधील’, मुनगंटीवार यांचा दावा

अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाजप नेते सुधील मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. अब्दुल सत्तार यांचं प्रकरण गेल्या सरकारमधील असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच गेल्या सरकारच्या काळात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे धृतराष्ट्रच्या भूमिकेत होते का? असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

अब्दूल सत्तार यांच्यावर नेमके आरोप काय?

“अब्दुल सत्तार यांनी तब्बल 37 एकर जमीन लाटल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. विशेष म्हणजे या जमिनीची किंमत 150 कोटी इतकी होती. पण ती जमीन अब्दुल सत्तार यांनी मातीमोल किंमतीत एका व्यक्तीला विकली”, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केलाय.

“सरकारची संपत्ती कुणाला देण्याचा अधिकार नाही. त्यांची अशी अनेक वेगवेगळी प्रकरणं समोर आलेली आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा”, अशी मागणी अजित पवार यांनी केलीय.

“कृषी विभागाला वेठीस धरलं आहे. मी अधिकाऱ्यांचं नाव घेत नाही. अधिकाऱ्यांनी म्हटलंय की दादा आम्हाला कोट करु नका. पण न विचारता आमचे तिथे फोटो टाकले आहेत”, असं अजित पवार विधानसभेत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *