एकनाथ शिंदेंना बंडासाठी कोणी तयार केलं? सहा महिन्यांनंतर सासवडमध्ये मिळालं उत्तर
सासवड : राज्यात जून 2022 मध्ये ऐतिहासिक सत्तांतर झालं. तत्कालिन मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील 40 आणि मित्र पक्ष, अपक्ष 10 अशा 50 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड पुकारलं. 10 दिवस चालेल्या या सत्तानाट्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांच्या पाठिंब्यावर आणि भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. ते मुख्यमंत्री झाले.
या नंतरच्या काळात या बंडाबद्दल अनेकदा वेगवेगळे उलगडे झाले. स्वतः एकनाथ शिंदे यांनी या बंडाची सुरुवात कशी झाली, भाजपनं कशी मदत केली, देवेंद्र फडणवीस यांनी कशी मदत केली याबाबतचे खुलासे केले होते. मात्र आता पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांना बंड करण्यासाठी कोणी तयार केलं याच उत्तर महाराष्ट्राला मिळालं आहे, असं म्हणावं लागेल. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सासवडमध्ये एका मेळाव्यात बोलताना याबाबत गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे?
राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यात उचल खाल्ली होती. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज सांगतो, हा उठावं करण्याचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात विजयबापू शिवतारेनंचं घातलं होतं. साडेचार तास नंदनवनला बसलो होतो. एकनाथ शिंदेंना सांगितलं हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. उद्धव साहेब चुकत आहेत. तुम्ही त्यांना प्रेशर करा. सांगा, हे तोडलं पाहिजे. भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे.
महाविकास आघाडी म्हणजे निवडणूकपूर्व सेटलमेंट :
ही महाविकास आघाडी नंतर नाही झाली. तुम्हाला आतलं राजकारण सांगतो. ७० सीट तुमच्या आमच्या लढवून घालवल्या. त्या उद्धव ठाकरे यांनी घालवल्या. तुम्ही आमचा आमदार पाडतो. ठीक आहे. भाजपचे लोक म्हणाले, आम्ही तुमचा मंत्री पाडतो, हे सगळं कशामुळं झालं? तर निवडणुकीपूर्वी सेटलमेंट झाली. कुठल्या सीट पाडायच्या. कुठल्या सीट निवडून आणायच्या. आकडेवारी कशी जुळवून आणायची? हे कट कारस्थान, महाविकास आघाडी नंतर नाही झाली. फसवत आहेत तुम्हाला. ती आधीच झाली होती.