ऋषी सुनकना धक्का, लिस ट्रस होणार ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान

लंडन, 5 सप्टेंबर : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत (Britain PM) ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना पराभवाचा धक्का लागला आहे. युकेच्या परराष्ट्र मंत्री लिस ट्रस (Liz Truss) यांचा पंतप्रधान व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे त्या आता बोरिस जॉनसन यांची जागा घेतील. लिस ट्रस यांना कंन्जर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या म्हणून निवडण्यात आलं आहे.
बोरिस जॉनसन यांचा उत्तराधिकारी म्हणून पक्षाच्या सदस्यांना ऋषी सुनक आणि लिस ट्रस यांच्यापैकी एकाची निवड करायची होती. 42 वर्षांच्या सुनक यांना पंतप्रधानदाच्या शर्यतीत 47 वर्षांच्या लिस ट्रस यांनी पराभूत केलं आहे.
पंतप्रधानांच्या निवडणुकीच्या या मतदानात कंन्जर्व्हेटिव्ह पक्षाच्या जवळपास 1 लाख 60 हजार सदस्यांनी मतदान केलं. निवडणुकीआधी आलेल्या सर्व्हेमध्येही ऋषी सुनक पिछाडीवर असल्याचं समोर आलं होतं. ऋषी सुनक यांनी प्रचारादरम्यान महागाई कमी करण्याचं तर ट्रस यांनी कर कपात करण्याचं आश्वासन दिलं होतं.
ऋषी सुनक यांच्यावर भारतीयांचं लक्ष
पंतप्रधानपदाची निवडणूक ब्रिटनमध्ये असली तरी याची चर्चा भारतात जोरात सुरू होती, कारण ऋषी सुनक यांचं भारत कनेक्शन. भारतीय मूळ असलेल्या ऋषी सुनक यांचा विजय व्हावा, यासाठी ब्रिटनमधले भारतीय प्रार्थना करत होते. ऋषी सुनक इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
लिस ट्रस तिसऱ्या महिला पंतप्रधान
लिस ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. याआधी मार्गारेट थेचर आणि थेरेस मे या ब्रिटनच्या महिला पंतप्रधान होत्या. ब्रिटनच्या तिन्ही महिला पंतप्रधान या कंन्जर्व्हेटिव्ह पक्षाच्याच आहेत. तसंच लिस ट्रस मागच्या 6 वर्षांमधल्या ब्रिटनच्या चौथ्या पंतप्रधान होणार आहेत. याआधी डेव्हिड कॅमरून, थेरेसा मे, बोरिस जॉनसन हे पंतप्रधान राहिले. जॉनसन 2016 ते 2022 पर्यंत वेगवेगळ्या काळात पंतप्रधानपदावर होते.
लिस ट्रस या ब्रिटनच्या राजकारणातल्या फायरब्रॅण्ड नेत्या आहेत. दोन महिने चाललेल्या या निवडणुकीत ट्रस या आक्रमक राहिल्या. बीबीसीच्या रिपोर्टनुसार पंतप्रधान झाल्यानंतर ट्रस डाउनिंग स्ट्रीटजवळ एक छोटं भाषण देतील, जी एक परंपरा आहे.
7 जुलैला बोरिस जॉनसन यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर कंन्जर्व्हेटिव्ह पक्षात लिस ट्रस यांचा सामना ऋषी सुनक यांच्याविरुद्ध होता. पक्षाच्या जवळपास 1.60 लाख सदस्यांनी मतदान केलं. कंन्जर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांनी मतदानाच्या पाच राऊंडमध्ये सुनकना ट्रस यांच्यापेक्षा जास्त मतं दिली होती, पण अंतिम निर्णय पक्षाचे 1.60 लाख नोंदणीकृत सदस्य करतात. जॉनसन पूर्ण निवडणूक प्रक्रियेत ऋषी सुनक यांच्या बाजूने नव्हते. तुम्ही कुणालाही पंतप्रधान करा, पण ऋषी सुनक यांना नको, असंही जॉनसन म्हणाले होते. जॉनसन यांच्या सरकारमध्ये सगळ्यात आधी ऋषी सुनक यांनीच राजीनामा दिला होता.
कोणाला किती मतं?
लिस ट्रस : 81,326
ऋषी सुनक : 60,399
एकूण मतं: 172,437
एकूण मतदान : 82.6%
रद्द झालेलं मतं : 654
पुढे काय होणार?
6 सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी बोरिस जॉनसन पीएम हाऊस 10 डाउनिंग स्ट्रीटमधून पंतप्रधान म्हणून शेवटचं भाषण करतील, यानंतर ते महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांना राजीनामा देण्यासाठी स्कॉटलंडच्या एबरडीनशायरला जातील. सध्या क्वीन एलिजाबेथ इकडेच थांबल्या आहेत. 96 वर्षांच्या क्वीन एलिजाबेथ यांना चालण्याचा त्रास होत आहे, त्यामुळे जॉनसन आणि लिस हे दोघं त्यांच्याकडे जाणार आहेत. परंपरेनुसार हे काम बकिंघम पॅलेसमध्ये होतं.
किसिंग हॅण्ड्स सेरेमनी
जॉनसन यांनी राजीनामा दिल्यानंतर लिस ट्रस महाराणीला भेटायला जाईल. पारंपारिकदृष्ट्या या भेटीला किसिंग हॅण्ड्स सेरेमनी म्हणलं जातं. यावेळी मात्र क्वीनची तब्येत खराब असल्यामुळे ही सेरेमनी सिम्बॉलिक म्हणजेच प्रतिकात्मक होणार आहे. लिस ट्रस यांचा शपथविधी स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.