पृथ्वीराज चव्हाण

पुणे : पुढारी ऑनलाईन डेस्क :  मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणं महत्त्वाचं आहे. पण प्रत्येकाने केवळ आरक्षणाच्याच आशेवर बसून न राहता इतर मार्गांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम आरक्षण मीच दिले होते. त्यामुळे आरक्षणाचा फायदा प्रत्येकाला मिळावा असं मला मनापासून वाटतं, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं . संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

पुण्यात आज संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाला सुरुवात झाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना चव्हाण यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. पुढे ते म्हणाले, ‘ न्यायालयाचा वापर हा राजकीय हत्यार म्हणून होताना दिसतो आहे. आतापर्यंत राज्यात २९०० छापे पडले आहेत. महाराष्ट्राला ‘रेड (छापा ) राज्य’ म्हणावं की काय अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. अनिल देशमुख गेले वर्षभर आत होते. तर नवाब मलिक अजूनही आत आहेत. आता कायद्याच्या राजकीय वापराबाबत अजून काय बोलावं.