आज रात्रीपासून 3 दिवस बत्ती गुल? राज्यातील वीज कर्मचारी संपावर ठाम, प्रशासनाची त

मुंबई, 3 जानेवारी : राज्यातील वीज कर्मचारी आज मध्यरात्री पासून संपावर जाणार आहे. वीज कंपन्यांचे खाजगीकरण होऊ नये या प्रमुख मागणीसाठी वीज अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे हजारो कामगारांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान, कुठलाही निर्णय न झाल्यास थेट संप केला जाईल, असा इशारा वीज कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता.
त्यामुळे त्या आंदोलनात कुठलाही निर्णय झाला नाही. तसेच राज्य सरकारने याबाबत कुठलीही भूमिका दर्शवली नाही. त्यामुळे वीज कर्मचारी संघटनांनी याबाबत विरोध दर्शवत आज मध्यरात्री पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा संप 72 तासांचा असणार आहे. या संपात राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. इतकेच नव्हे तर वीज कंपन्यांच्या जवळपास 30 संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे.
आंदोलनाचा फटका –
महाजनकोच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा वीज निर्मितीवरती फटका बसणार आहे. आंदोलन काळात कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यासंदर्भात अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांना महाजनकोचे चीफ इंजिनियर यांनी पत्र लिहिले आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून 72 तासांसाठी महावितरणचे कर्मचारी संपावरती जाण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावपळ सुरू झाल्याचेही पाहायला मिळत आहे.
नागरिक चिंतेत –
सरकारने खाजगीकरण करू नये अशी प्रमुख मागणी वीज संघटनांनी केली आहे. आज 3 जानेवारीच्या रात्री 12 वाजेनंतर 72 तासासाठी हे सर्व कर्मचारी संप करणार आहे. यावेळी कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नाही. त्यामुळे संपा दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील नागरिक चिंतेत आहे.
राज्यातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण केले जाणार आहे. अदानी ग्रुपसोबत करार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांना मिळाल्याने त्यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. त्यामुळे वेळीच सरकारने निर्णय घेतला नाहीतर वीज कर्मचारी खाजगीकरणाच्या मुद्दावरुन अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांसारखा संप पेटणार नाही याची खबरदारी सरकार घेते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.