आजचा दिवस मोर्चाचा! आघाडीच्या महामोर्चाला शिंदे गटाचे बंदने उत्तर? कशी आहे तयारी

आजचा-दिवस-मोर्चाचा!-आघाडीच्या-महामोर्चाला-शिंदे-गटाचे-बंदने-उत्तर?-कशी-आहे-तयारी

मुंबई, 17 डिसेंबर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यपाल आणि भाजप नेत्यांच्या विरोधात महाविकासआघाडीने शनिवारी 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चाचे आयोजन केलं आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिंदे गट आणि भाजपनेही कंबरी कसली आहे. आज  कल्याण, डोंबिवली बंद ठेवण्याचा निर्णय सर्व हिंदुत्ववादी संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला आहे. परिणामी आजचा दिवस मोर्चामय होणार असल्याचे दिसत आहे. चला कोणाचा मोर्चा कसा असेल? त्यांचा सर्वसामान्यांवर काय प्रभाव पडणार याबद्दल जाणून घेऊ.

महाविकास आघाडीचा महामोर्चा

महापुरूषांच्या अवमानाविरोधात, राज्यातील प्रकल्प बाहेर गेले, शेतकरी, बेरोजगारी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अशा विविध प्रश्नांवर हा मोर्चा असणार आहे. तर या मोर्चात दीड ते दोन लाख कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांकडून दिला जात आहे. 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता हा मोर्चा मुंबईतील रिचर्डसन्स क्रुडास मिलपासून निघणार असून टाइम्स ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे. प्रमुख पक्षांवर प्रत्येकी 50 हजार कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी असणार आहे. तर पोलीस प्रशासनाकडून या मोर्चाला सुमारे 2500 पेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. तर 250 पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकारी असणार आहेत. दरम्यान, मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी 13 अटी घातल्या आहेत.

दोन समाजामध्ये तेड निर्माण होईल असं कोणतंही भाष्य नेत्यांनी करू नये, कोणतेही आक्षेपार्ह विधान करू नये, मोर्चात आर्म्स अॅक्टनुसार चाकू, तलवारी अशे कोणतेही शस्त्र बाळगू नये, मोर्चादरम्यान कुठेही फटाके फोडू नये, दिलेल्या मार्गानुसारच हा मोर्चा मार्गास्त करावा, सर्व नियमांच पालन करण्यात यावं, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असा प्रकारच्या अटी या पक्षांसमोर ठेवण्यात आल्या आहेत.

वाचा – काम करणाऱ्यांची चर्चा होते तर.. विरोधकांच्या महामोर्चाचा मुख्यमंत्र्यांकडून एका वाक्यात समाचार

महामोर्चाचा मार्ग

सकाळी 11 वाजल्यापासून हा मोर्चा चालू होणार आहे. जे.जे. हॉस्पिटल लगत असलेल्या रिचर्डसन आणि क्रड्स कंपनीपासून मोर्चाला सुरू होणार तर पुढे टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा महामोर्चा जाईल त्यानंतर मुख्य रस्त्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा होणार आहे. मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी सीएसटी स्थानकाच्या मागे पार्किंगची व्यावस्था करण्यात आली आहे. तर या मोर्चाला मविआ मधील जेष्ठ नेते संबोधित करणार आहेत.

आघाडीतील मित्रपक्षाकडून जोरदार तयारी

शरद पवार या मोर्चाला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी कडून अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि इतर जेष्ठ नेत्यांसह पक्षातील सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, या प्रमाणेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर, सुभाष देसाई, अनिल परब असे अनेक नेते हजेरी लावणार आहे. तर काँग्रेसमधून सर्व आमदार, त्याच बरोबर नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे अनेक जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या महामोर्चामुळे शिंदे-भाजप सरकारवर दबाव निर्माण होवू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिंदे गटाची ठाणे, डोंबिवली बंदची हाक

हिंदू देव-देवता, संत-महंतांबद्दल सतत व्देषपूर्ण विधाने करुन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, वारकरी संप्रदायाचा अपमान करत भाषणे देत राज्यभर फिरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी शनिवारी कल्याण, डोंबिवली बंद ठेवण्याचा निर्णय सर्व हिंदुत्ववादी संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला आहे. बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी एक पत्रक प्रसिध्द करुन हिंदूंच्या तीव्र भावना दुखविल्याने अंधारे यांचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी अंधारे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. शिवसेना शाखेत बंदनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेला बाळकृष्ण महाराज, प्रकाश महाराज, तुकाराम महाराज पाटील, वारकरी संप्रदायाचे प्रमुख, रमेश म्हात्रे, राजेश कदम, दीपेश म्हात्रे, संतोष चव्हाण, महेश पाटील उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *