अॅसिड हल्ल्यातल्या पीडित महिलांसाठी `त्या` बनल्या देवदूत

आज महिला सर्वच क्षेत्रांत भरारी घेत आहेत. आपलं आयुष्य कसं असावं, करिअरची रूपरेषा कशी असावी या गोष्टींचा विचार त्या करू शकतात. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे काही महिलांची स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांना कोणत्याही गोष्टींचं स्वातंत्र्य नाही. अर्थात यामागे काही सामाजिक, आर्थिक तसंच अन्य काही कारणं आहेत. कंवल, नाझ या महिलांची स्वप्नं खूप मोठी होती; पण एका दुर्घटनेनं त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं; मात्र दुर्घटनेतून आयुष्य सावरण्यासाठी त्यांना एका महिला डॉक्टरने मोलाची मदत केली. या महिलांची कहाणी जाणून घेऊ या. `आज तक`ने त्यांच्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
पाकिस्तानात राहणारी 40 वर्षांची कंवल एअर होस्टेस बनू इच्छित होती. आकाशात उंच भरारी घेण्याचं तिचं स्वप्न होतं; पण 2011मध्ये एक दुर्घटना घडली. तिने एअर होस्टेस होऊ नये, अशी तिच्या मित्राची इच्छा होती. त्यातून असूयेपोटी त्याने तिच्यावर अॅसिड फेकलं. यामुळे तिचा चेहरा विद्रूप झाला. कंवलची इच्छा पूर्ण होऊ नये म्हणून तिच्या मित्रानं हे कृत्य केलं. या अॅसिड हल्ल्यात कंवलचं नाक, भुवया, पापण्यांना इजा झाली. तिचा ड्रीम जॉब आता कायमचं स्वप्नच राहणार होता. त्यानंतर यूकेतल्या मँचेस्टरमधल्या हेअर ट्रान्सप्लांट सर्जन असीम शाहमलक यांनी कंवलला खूप मदत केली. असीम यांनी तिच्यावर मोफत उपचार केले. त्यासाठी असीम मँचेस्टरवरून कराचीला आल्या. त्यांनी तिच्या भुवया आणि पापण्या पहिल्यासारख्या बनवल्या. त्यासाठी त्यांनी डोक्यावरच्या केसांचा वापर केला.
नाज बानो ही डॉ. असीम यांची रुग्णदेखील अॅसिड हल्ल्यातून बचावलेली आहे. नाजच्या मुलीच्या लग्नात तिच्यावर अॅसिड हल्ला झाला. यामुळे तिच्या डोळ्यांना इजा झाली. डॉ. असीम यांनी नाजसाठी भुवया आणि पापण्या तयार केल्या. सर्जरीनंतर ती यातून लवकर बरी झाली. ती सध्या एका दुकानात काम करते. डॉ. असीम यांचा कराचीतला एक रुग्ण मोहम्मद उस्मान हा 28 वर्षांचा युवक कम्प्युटर डिझायनर आहे. त्याने अॅसिड हल्ल्यात त्याचे दोन्ही डोळे गमावले आहेत. या हल्ल्यानंतर त्याचा चेहरा चांगला करण्यासाठी त्याच्यावर चार सर्जरीज करण्यात आल्या आहेत. 19 वर्षांच्या मारिया अफझलची कहाणी अशीच आहे. मारिया दोन वर्षांची असताना ती तंदूरमध्ये पडली होती. त्यामुळे तिच्या कपाळावरचा भाग भाजला आणि केस जळले होते. खरंतर, पाकिस्तानमध्ये अशा दुर्घटनांना तोंड दिलेल्या अनेक महिला आहेत, ज्यांच्यावर उपचारांची गरज आहे. डॉ. असीम अशा महिलांवर उपचार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अॅसिड हल्ल्यातल्या पीडितांना मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकरिता डॉ. असीम यांचा ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. यावेळी जॉन्सन यांनी डॉ. असीम यांचं कौतुक केलं.
`डॉक्टरांचे मी कितीही आभार मानले तरी कमी आहे. त्यांनी माझा चेहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे,` अशी प्रतिक्रिया कंवलने दिली आहे.
`कंवलसारख्या धाडसी महिला मला क्वचितच भेटल्या आहेत. हल्ल्यानंतर तिने तिचं जीवन कसं पुन्हा उभं केलं ते पाहिलं आहे. आता ती एका कापड कंपनीत यशस्वीपणे काम करत आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला,` असं डॉ. असीम यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.