अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्यावर महिला कर्मचाऱ्याचे गंभीर आरोप; वाचा सविस्तर

मुंबई, 7 नोव्हेंबर: अॅमेझॉन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ई-कॉमर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, ऑनलाइन जाहिराती, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. जगातील सर्वांत प्रभावशाली कंपन्यांमध्ये अॅमेझॉनचा समावेश होतो. जेफ बेझोस यांनी या कंपनीची स्थापना केलेली आहे. जेफ बेझोस यांच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश होतो. श्रीमंतीच्या बाबतीत चौथ्या स्थानावर असलेल्या जेफ बेझोस सध्या एका विचित्र कारणामुळे चर्चेत आले आहेत. जेफ यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यानं जेफ यांच्यावर वांशिक भेदभावाचा आरोप केला आहे. तिला आणि इतर काही घरकाम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना घरात टॉयलेट वापरण्याची परवानगी नव्हती, असं या महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.
‘द गार्डियन’ आणि ‘ब्लूमबर्ग’नं दिलेल्या वृत्तानुसार, मर्सिडिज वेडा (Mercedes Wedaa) नावाच्या कृष्णवर्णीय महिलेने जेफ बेझोसवर हे गंभीर आरोप केले आहेत. बेझोसच्या सिएटल येथील मॅन्शनमध्ये काम करणाऱ्या मर्सिडीजनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, बेझोस यांच्या घराचा मॅनेजर तिच्यावर सतत रागावायचा आणि शिवीगाळ करायचा. या उलट, तिथे काम करणार्या इतर श्वेतवर्णीय कर्मचार्यांना आदरानं आणि सभ्यतेनं वागवलं जात असे. तिला या कर्मचार्यांच्या तुलनेत जास्त वेळ काम करावं लागत असे.
10 ते 14 तास काम-
मर्सिडीज वेडानं 2019 पासून बेझोसच्या घरात काम करायला सुरुवात केली होती. सुमारे तीन वर्षं काम करताना भेदभावाचा सामना करावा लागल्याचं तिनं सांगितलं. तिला दररोज 10 ते 14 तास काम करावं लागत होतं. या दरम्यान तिला जेवणाची आणि विश्रांतीची परवानगी नव्हती.
हेही वाचा:Volvo ex90: इलेक्ट्रिक कार आहे की पॉवर बँक, घरालाही पुरवू शकते वी
टॉयलेट वापरण्याची परवानगी नव्हती-
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिला आणि इतर हाउसकीपिंग स्टाफला टॉयलेटला जाण्यासाठी लाँड्री रूमच्या खिडकीतून उडी मारून बाहेर जावं लागत असे. कारण, घरात काम करत असताना आतील टॉयलेट वापरण्याची परवानगी नव्हती. याशिवाय घरामध्ये काम करणाऱ्यांसाठी अशी एकही जागा नाही जिथे ते कामाच्या दरम्यान आराम करू शकतील किंवा जेवू शकतील. घरातील कामगारांना बाथरुम जवळच्या एरियामध्ये बसून जेवावं लागतं.
बेझोसच्या वकिलांनी केलं आरोपांचं खंडन-
जेफ बेझोस यांच्यावर केस दाखल झाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांचा बचाव केला आहे. त्यांनी महिला कर्मचाऱ्याने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे आहेत, असं वकिलांचं म्हणणं आहे.
जेफ बेझोस अलीकडेच टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आले आहेत. त्यांची जागा भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.