अमित शाह यांचा निवाडा पायदडी तुडवत कन्नडिगांनी आपला खरा रंग दाखवला, हिवाळी अधिवेशनात घमासान

बेळगावात कर्नाटक सरकार आणि तिथल्या पोलिसांची दडपशाही पुन्हा एकदा दिसली. त्यावरुन शिंदे-अजित पवारांमध्ये जुंपली.
नागपूर : नागपुरातलं हिवाळी अधिवेशन वादळी होणार, अशी चर्चा होतीच. आणि पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आमनेसामने आलेत. बेळगावात कर्नाटक सरकार आणि तिथल्या पोलिसांची दडपशाही पुन्हा एकदा दिसली. त्यावरुन शिंदे-अजित पवारांमध्ये जुंपली. खरंतर सीमावादावरुन असा संघर्ष टाळण्यासाठीच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. पण 8 दिवसांच्या आतच, कर्नाटक सरकार आणि त्यांच्या पोलिसांची मुजोरी सुरु झाली.
कर्नाटकात ये-जा करण्यावर कुठलीही बंदी नाही हे अमित शाहांनी स्पष्ट केलेलं असताना, कर्नाटकच्या पोलिसांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना रोखलं. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावातला मेळावाच्या परवानगीही ऐनवेळी रद्द केली.
दडपशाही करत बेळगावात पोलिसांनी कलम 144 लावलं. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं.
यानंतर महाविकास आघाडीचे नेते बेळगावात जाण्यासाठी निघाले. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, विजय देवणेंना कोगनोळी टोलनाक्यावरच कर्नाटकच्या पोलिसांनी रोखलं. यावेळी कर्नाटक पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. याचेच पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले.
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अमित शाहांच्याच बैठकीवर बोट ठेवत, शिंदे-फडणवीसांना सवाल केले.
लोकशाही पद्धतीनं बेळगावात होणारी आंदोलनं किंवा मेळावे का रोखले? याचा जाब कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विचारणार, असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.
बेळगावात एंट्री करण्याआधीच कर्नाटक पोलिसांनी हसन मुश्रिफांना ताब्यात घेतलं आणि सोडूनही दिलं. पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत त्यांना तातकळत ठेवलं.
त्यावरुन बेळगावातल्या शिनोळी गावात महाराष्ट्र एकीकरण समितीनं रस्त्यावरच आंदोलन केलं.
अमित शाहांच्या बैठकीत जे काही ठरलं होतं. त्या बाबी पायदळी तुडवत कन्नडिगांनी आपला खरा रंग दाखवला. त्यामुळं इकडे महाराष्ट्रात विरोधक आणि सरकार आमनेसामने आले.
त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या बनावट ट्विट मागे कोण आहे आणि कोणता पक्ष आहे, ते लवकरच समोर आणणार असा इशाराच शिंदेंनी विरोधकांना दिलाय.
आता शिंदेंनी इशारा दिल्याप्रमाणं, बोम्मईंचे चिथावणी देणाऱ्या ट्विट मागे कोण? नेमक्या कोणत्या पक्षाचा हात आहे यावरुन चर्चा सुरु झाल्यात.