अकोल्यात ठाकरे गटाच्या ताकदीला मोठा धक्का : जुन्या शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. यात आता अकोला येथील विजय मालोकार या बड्या नेत्याचंही नाव जोडलं गेलं आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विजय मालोकार यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. अकोल्यातील भाजप पक्ष कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मालोकार यांनी सहा दिवसांपूर्वीच शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. ठाकरे गटातील मुस्कटदाबीला कंटाळून पक्ष सोडल्याचा दावा त्यांनी केला होता. तसंच खासदार अरविंद सावंत आणि मालोकार यांच्यात मतभेद झाल्याच्याही बातम्या माध्यमांमध्ये होत्या. मालोकारांच्या राजीनाम्याने अकोल्यातील ठाकरे गटाच्या ताकदीला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.
कोण आहेत विजय मालोकार?
विजय मालोकार हे विदर्भ आणि अकोल्यातील शिवसेना पक्षाच्या सुरुवातीच्या काळातील शिवसैनिकांपैकी एक आहेत. शिवसेनेत त्यांनी जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर काम केलं आहे. 1995 मध्ये युतीच्या काळात त्यांनी एसटी महामंडळाचे संचालकपदही भूषवलं.
वर्ष १९९९ मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन निवडणुकीत त्यांना डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मालोकारांनी अकोला पूर्व मतदारसंघात 2004 मध्ये अपक्ष म्हणून 40 हजार मतं घेतली. तर 2009 मध्ये जनसुराज्यच्या तिकिटावर घेतली 30 हजार मतं घेतली होती. सध्या ते शिवसेना प्रणीत ‘महाराष्ट्र एसटी कामगार सेने’चे प्रदेश कार्याध्यक्ष होते.